राज्याला २ हजार कोटींचे क्लस्टर; ५ हजार युवकांना रोजगार निर्माण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:06 AM2022-11-01T06:06:36+5:302022-11-01T06:19:00+5:30
पुण्यातील रांजणगाव आता हाेणार इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक उद्योग गुजरातमध्ये जात असताना केंद्र सरकारने आज महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक क्लस्टर देऊ केले आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. यातून ५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अडीच वर्षात हे क्लस्टर विकसित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प व बल्क ड्रग पार्कसारखे मोठे प्रकल्प राज्यातून गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारला विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना व लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रातील रांजणगाव येथे ईएमसी उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) हे क्लस्टर उभारण्याची मंजुरी आज दिली. यामुळे रांजणगाव एक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होईल, असेही ते म्हणाले.
तरुणांना उद्याेगाची संधी-
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती भारतीय बनावटीची राहावी, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून, या हेतूने पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअपला चालना देण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. सी-डॅक ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, येत्या काही वर्षात एक हजार कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स चीप व इतर पूरक उद्योगांवर यात भर दिला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी उद्योग उभारावेत, यासाठी येत्या काही दिवसात पुण्यात रोड शो हाेणार असल्याचे ते म्हणाले.
उद्योग गेल्याने फरक पडत नाही-
महाराष्ट्रातून उद्योग जात असल्याने घाईघाईने या प्रकल्पाची घोषणा केली काय? असे विचारले असता राजीव चंद्रशेखर म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. एखाद्या राज्यातून एखादा उद्योग गेल्याने फरक पडत नाही.
बनावट कथानक : फडणवीस
आमच्या सरकारच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही. पण सध्या बनावट कथानकांची फॅक्टरी उघडून त्याद्वारे महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या हेतूने ‘मविआ’चे काही नेते आरोप करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.