बिहारच्या नदी-नाल्यांमध्ये सापडताहेत एके-47; सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 04:20 PM2018-10-03T16:20:39+5:302018-10-03T16:21:59+5:30
आतापर्यंत 20 एके-47 रायफल, 500 सुटे भाग पोलिसांच्या हाती
पाटणा: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात पोलिसांकडून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 20 एके-47 रायफल सापडल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गंगा नदीला जाऊन मिळणाऱ्या नाल्यांमध्ये सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये एके-47 सापडल्यानंतर पोलिसांनी मुंगेरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एके-47 चे सुटे भाग आढळून आले. नद्या आणि नाल्यांमधून पोलिसांनी एके-47 चे सुटे भाग ताब्यात घेतले. 29 ऑगस्टला एका हत्यारांच्या रॅकेटचा पदार्फाश झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 20 एके-47 रायफल आणि 500 सुटे भाग आढळून आले. जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये हत्यारांचे सुटे भाग सापडल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
सध्या मुंगेर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंगेर जिल्हा अवैध हत्यारांच्या निर्मितीसाठी कुख्यात आहे. या जिल्ह्यात अत्याधुनिक हत्यारांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. यावेळी गंगा नदीच्या किनाऱ्यावरुन एके-47 चे 281 सुटे भाग सापडले आहेत. सध्या पोलिसांनी या भागात जोरदार कारवाई सुरू केली असून मंगळवारी पोलिसांना मंजार वर्धा गावातील एका घरात एके-47 चे 91 सुटे भाग आढळले आहेत. विशेष म्हणजे या घरावर छापा टाकण्याआधी या घरात वास्तव्यास असणारे लोक फरार झाले होते.