धक्कादायक... एकच इंजेक्शन वापरल्यानं २० जणांना HIVची लागण, बोगस डॉक्टरचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:04 AM2018-02-06T11:04:41+5:302018-02-06T11:05:33+5:30
उन्नावमधील डॉक्टरने जास्त पैसे कमवायचा नादात 20 जणांचा जीव धोक्यात टाकला आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्नावमधील डॉक्टरने जास्त पैसे कमवायचा नादात 20 जणांचा जीव धोक्यात टाकला आहे. बांगरमऊ तहसीलमध्ये एक झोलर डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून सायकलीवर फिरून लोकांवर उपचार करतो आहे. धक्कादायक म्हणजे हा झोलर डॉक्टर प्रत्येक रूग्णासाठी एकाच इजेंक्शनचा वापर करतो आहे. बोगस डॉक्टरच्या या प्रतापामुळे तेथिल 20 लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे.
याप्रकरणी त्या झोलर डॉक्टर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. झोलर डॉक्टरने इंजेक्शन एका एचआयव्ही ग्रस्त रूग्णाला दिलं होतं. त्यामुळे इंजेक्शनच्या सुईला एचआयव्हीचे जंतू लागले. तेच एक इंजेक्शन या बोगस डॉक्टरने इतर रूग्णांसाठीही वापरले. त्यामुळे बांगरमऊ तहसीलमध्ये आत्तापर्यंत 20 लोकांनी एचआयव्हीची लागण झाली आहे. या लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणं दिसायला लागली आहेत.
नोव्हेंबर 2017मध्ये एका एनजीओने बांगरमऊ तहसीलमधील काही गावात एक हेल्थ कॅम्प सुरू केला होता. या कॅम्पच्या माध्यमातून गावातील लोकांची तपासणी झाल्यावर काही लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणं दिसली. या पीडितांना उपचारासाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकरणाची सूचना वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी जानेवारी महिन्यात बांगरमऊमध्ये वेगवेगळे तीन आरोग्य शिबीर सुरू केले. आरोग्य विभागाने दोन सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने बांगरमऊ ब्लॉकच्या प्रेमगंज, चकमीरपूरसह अनेक वस्त्यांमध्ये जाऊन एचआयव्ही पसरविणाऱ्या कारणांचा तपास करण्यासाठी पाठविलं. बाजूच्या गावात राहणारा राजेंद्र कुमार नावाच्या एका झोलर डॉक्टरने स्वस्त इंजेक्शनच्या नावावर तेथिल लोकाचे उपचार केले ज्यामुळे एचआयव्हीची लागण झाल्याचं कमिटीच्या तपासात समोर आलं.
जानेवारीमध्ये 500 पेक्षा जास्त लोकांनी आरोग्य तपासाणी केली होती. ज्यामुले 40 लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणं दिसली. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली. एचआयव्हीचे लक्षण दिसणारे सगळे इन्फेक्शनचे ग्रासले असल्याचं समोर आलं. आत्तापर्यंत 20 लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, यामध्ये चार-पाच मुलांचाही सहभाग आहे.
गावातील लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणं दिसल्यानंतर जिल्हा हॉस्पिटलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिले. एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी झोलर डॉक्टरबद्दल सांगितलं. यानंतर डॉ.प्रमोद कुमार यांनी 30 जानेवारी रोजी बांगरमऊ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितांच्या जबाबानंतर आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली जाणार आहे.