आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत २० चंदनतस्कर ठार
By Admin | Published: April 8, 2015 02:55 AM2015-04-08T02:55:51+5:302015-04-08T02:55:51+5:30
चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले.
चित्तूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या
चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले. सुमारे २०० तस्करांनी निबिड जंगलात विळे, कुऱ्हाडी, तलवारी, गावठी शस्त्रे आणि दगडफेकीसह केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबाराचा प्रभाव लक्षात घेऊन ठार झालेल्या सहकाऱ्यांना तेथेच टाकून बाकीच्या तस्करांनी पळ काढला.
ठार झालेल्या तस्करांमध्ये १२ तामिळींचा समावेश असल्यामुळे तामिळनाडूत शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. द्रमुक, भाकपा, पीएमके आणि भाजपाने आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. मारले गेलेले गरीब लाकूडतोडे असून, सरकारने तस्करी रोखताना कायदेशीर मार्ग अवलंबावा, अशी मागणीही या पक्षांनी केली.
या घटनेवरून आंध्र आणि तामिळनाडूत अक्षरश: जुंपली आहे. तशातच स्वत:हून गोळीबाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस पाठवत दोन आठवड्यांत अहवाल मागितला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशावरून जंगलभागात हवाई पाहणी केली जात आहे. पहाटे ५ ते ६ वाजतादरम्यान चित्तूरच्या ‘चंद्रगिरी मंडल’मधील शेषाचलम् जंगल भागात दोन ठिकाणी चकमकी झाल्या. काही तस्कर रक्तचंदनाची खोडे वाहून नेताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. रक्तचंदनतस्करांनी वन कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले केल्याचा दीर्घ इतिहास आहे. डिसेंबर २०१३मध्ये शेषाचलम्च्या जंगलात चंदनतस्करांनी २ वन अधिकाऱ्यांना मारले होते.
विशेष कृती दलाची स्थापना
चंदनाची तस्करी रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने जून २०१३मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना केली असून, त्यात पोलीस अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
वीरप्पन टोळीचा सहभाग?
कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन मारला गेला असला तरी त्याच्या टोळीचा शेषाचलम् जंगलातील तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आंध्र प्रदेश पोलिसांनी नाकारलेली नाही. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात तेलगू देसम्चे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगतच्या तामिळनाडूतील तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करून शेकडो टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. बहुतांश तस्कर तामिळनाडूतून येत असून, ते एकावेळी शंभरावर लाकूडतोड्यांना जंगलात पाठवितात. आशियात पारंपरिक औषध आणि अन्य वापरासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो.
तामिळनाडूत निदर्शने
तमिळगा वालवुरीमाई काची या संघटनेने तामिळनाडूच्या विविध भागांत निदर्शने करीत गोळीबाराचा निषेध केला आहे.