अभिनेता सोन सूदच्या घरी 20 तास चौकशी, दुसऱ्या दिवशीही तपास सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:39 AM2021-09-16T11:39:03+5:302021-09-16T11:39:54+5:30
सोनू सूद याच्या घरी, कार्यालयात सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी २० तास तपासणी केली होती.
नवी दिल्ली/मुंबई : कोरोना महामारीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गाव गाठण्यासाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने खऱ्या अर्थाने नायक बनलेल्या अभिनेता सोनू सूदच्यामुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांसह सहा ठिकाणांची प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तपासणी केली. या तपासणीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यानंतर, आज दुसऱ्या दिवशीही अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरूच आहे. त्यामुळे, या धाडीत नेमकं काय सापडणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोनू सूद याच्या घरी, कार्यालयात सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी २० तास तपासणी केली होती. अद्याप या तपासणीत नेमकं काय हाती लागलं याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोनू सूदनेच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी होत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
सोनूचे आर्थिक उत्पन्न, खर्च, गुंतवणूक, त्याचे आर्थिक व्यवहार, हिशेबाची पुस्तके या सगळ्याची पाहणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. मुंबईतील पाच ठिकाणी तर सोनूशी संबंधित लखनऊमधील एका कारखान्याची तपासणी प्राप्तिकर खात्याने केली. दरम्यान, सोनू सूदची अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या शैक्षणिक योजनेचा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याने त्याचा संबंध या तपासणीत होता का, याविषयीचा तर्क लढवला जात होता.