भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?
By admin | Published: September 22, 2016 01:26 AM2016-09-22T01:26:27+5:302016-09-24T04:15:41+5:30
भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे
ऑनलाइन लोकमत,
नवी दिल्ली, दि. 22 - उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय लष्करानं आता मोहीम उघडली आहे. भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, असं वृत्त द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराच्या कोणत्याही प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
या हल्ल्यात आतापर्यंत 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराच्या दोन पॅरा फोर्सनं हा हल्ला केला आहे. भारतीय लष्कराच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या या पॅरा फोर्समध्ये जवळपास 18 ते 20 जवान असल्याचं समजतं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त करून 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात 200हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते आहे. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं केला आहे.
मात्र केंद्र सरकार, लष्कराचा कोणत्याही सूत्रांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. क्विन्टच्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीएआय)नं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांमधून विमानसेवाही रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डू या शहरांची सेवा याच कारणास्तव खंडित केल्याची माहिती क्विन्टनं दिली आहे.