लखनऊ मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात जप्त केले 20 किलो तंबाकूजन्य पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 12:10 PM2017-09-08T12:10:26+5:302017-09-08T12:22:25+5:30
लखनऊ मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सिक्युरिटी चेक करत असताना प्रवाशांकडून तब्बल वीस किलो तंबाकूजन्य पदार्थ ताब्यात घेतले.
लखनऊ, दि. 8- लखनऊ मेट्रो सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. उद्धाटनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मेट्रोमध्ये बिघाड झाल्याने लखनऊ मेट्रो चांगलाच चर्चेचा विषय झाली होती. तेथिल मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची सुरक्षेच्यादृष्टीने तपासणी केली जाते. बुधवारी लखनऊ मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सिक्युरिटी चेक करत असताना तब्बल वीस किलो तंबाकूजन्य पदार्थ प्रवाशांकडून ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. 20 किलो तंबाकूजन्य पदार्थ आणि सिगारेट्स एका दिवसात लखनऊ मेट्रो प्रशासनाकडे जमा झाल्या. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
याशिवाय लाइटर, काडेपेटी जप्त करण्यात आली असून जे प्रवासी पान मसाला खात मेट्रोने प्रवासासाठी येत होते त्यांनासुद्धा कर्मचाऱ्यांनी तपासणी दरम्यान तोंडातील पानमसाला थुंकून यायला सांगितलं. आठ मेट्रो स्टेशनपैकी सगळ्यात जास्त पानमसाल्याची पाकिटं चारबाग स्टेशनवरच्या प्रवाशांकडे मिळाली. चारबाग स्टेशनवर एकुण सहा किलो पानमसाला जमा झाल्याचं समजतं आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टनगर मेट्रो स्टेशनचा नंबर लागतो. या स्टेशवरून एकुण 4 किलो पानमसाल्याची पाकिटं जमा झाली. मेट्रोतून प्रवास करताना तंबाकूजन्य पदार्थ बाळगण्याची मनाई असल्याची बाब मला आणि माझ्या मित्राला माहिती नव्हती. पण जेव्हा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पानमसाला त्यांच्याकडे द्यायला सांगितला. तेव्हा आम्ही लगेचच तो त्यांच्याकडे दिला आणि नंतर मेट्रोने प्रवास केल्याचं एका प्रवाशाने सांगितलं आहे.
लखनऊ मेट्रोच्या आठ स्टेशनच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणाऱ्या पाचपैकी तीन प्रवाशांच्या खिशात तंबाकुची पाकिटं सापडली तसंच काही जण तंबाकू खातानाही आढळून आले. तंबाकूजन्य पदार्थ बाळगून मेट्रोत जाणं शक्य नसल्याचं प्रवाशांना माहिती नसल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात तंबाकूजन्य पदार्थ आढळून आले. सिक्युरिटी चेकिंगच्या वेळी प्रवाशांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं.
लखनऊ मेट्रोने प्रवास करणारी लोक ही उत्तम सहाय्य करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. मेट्रोमध्ये तंबाकूजन्य पदार्थाला असलेली बंदी प्रवाशांना माहिती नसल्याने ही समस्या उद्भवली होती. मेट्रोमध्ये काय करावं आणि काय करू नये याबद्दल लोकांना मार्गदर्शन करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, असं लखनऊ मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव म्हणाले आहेत.