उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:10 PM2024-03-07T14:10:15+5:302024-03-07T14:12:09+5:30
पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.
कावेरी नदीचं पाणी कमी झाल्याने आणि वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्नाटकच्या बंगळुरूमधील काही भागात पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. पाण्याची वाट पाहावी लागत आहे. बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड, महादेवपुरा आणि आरआर नगरसारख्या भागात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.
बंगळुरूमधील अनेक भागात बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एआर नगरच्या संपूर्ण पट्टानगरमध्ये लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकापेक्षा जास्त भांड्यात पाणी घेतल्यास अधिकारी परत पाठवतात, असा आरोप लोकांनी केला आहे.
अधिकारी आपल्या मुलांनाही सोबत राहू देत नसल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. ते मुलांना परत पाठवतात. जनावरांना आंघोळ घालण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठीही पाणी नसल्याचं लोक सांगतात. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
आरओ प्लांटमधून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त एकच कॅन घेण्याची परवानगी आहे. आम्हाला आता प्रत्येक कॅनसाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील, ज्यासाठी पूर्वी 600 ते 1000 रुपये आकारले जात होते. त्यांनी खासगी टँकरला पाण्याचे दर कमी करण्यास सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या भागात येणं बंद केलं, असा आरोप लोक करतात. सरकारला दररोज ई-मेल पाठवले जातात, पण आजपर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही.
बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट गंभीर होत आहे. तज्ज्ञांनी सरकारला जलसंकटाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. शेकडो अपार्टमेंटमध्ये पिण्याच्या पाण्याचा थेंबही नाही. उन्हाळा येण्याआधीच शहरातील सुमारे 50 टक्के बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. लोकांचे यामुळे अतोनात हाल होत असून अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे.