सर्जिकल स्ट्राइकमध्ये तोयबाचे २० अतिरेकी ठार
By admin | Published: October 10, 2016 05:31 AM2016-10-10T05:31:25+5:302016-10-10T05:31:25+5:30
उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने केला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद हाच तोयबाचा प्रमुख आहे.
या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यात जी चर्चा झाली आहे त्यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तोयबाचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. भारतीय सैन्याकडून अशी काही कारवाई होईल, याची पुसटशी कल्पनाही या अतिरेक्यांना नव्हती. त्यामुळे या कारवाईने ते थक्कच झाले. भारतीय सैन्याने या अतिरेक्यांना मारण्यास सुरुवात केली तेव्हा हे अतिरेकी त्यांच्या चौकीकडे पळताना दिसत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची वाहने आली आणि त्यांनी हे मृतदेह अज्ञात स्थळी नेले. सिमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आमचे दोन सैनिक ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
भांडवल करू नका-
‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भाजपा करीत असल्याचा आरोप, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.
भारताचा भाग ताब्यात घ्या - रामदास आठवले
च्अमरावती : उरी घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून देशाची शान वाढविली आहे. मात्र, आता शत्रूला धडा शिकविण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरातील भारताचा भाग ताब्यात घ्यावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी
व्यक्त केले.अमरावती येथे आयोजित बुद्ध महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरसंघचालकांकडून समर्थन-
नागपूर : उरी येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरून देशभरातील राजकारण तापत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या लष्करी कारवाईचे स्वागत केले आहे. आपल्याकडे किती शक्ती आहे हे ती दाखविल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे शक्ती दाखविणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आज जग आपल्यासोबत उभे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. नागपुरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.