हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातंय कुत्रे-मांजरांचं मांस?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 01:03 PM2018-04-27T13:03:20+5:302018-04-27T13:03:20+5:30
बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली.
कोलकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या राजाबाजारमध्ये एका बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसावर त्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये प्रक्रिया करून हॉटेल- रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातं असल्याचं समोर येतं आहे. कोलकात्यातील बर्फाच्या फॅक्टरीमध्ये सुरू झालेली छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छापेमारीत पॅक केलेल्या आणि विकण्यासाठी तयार असलेलं एकुण 20 टन मांस जप्त करण्यात आलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
मेलेल्या जनावरांचं मांस घेऊन जाणाऱ्या तीन लोकांना अटक केल्यानंतरच्या एका आठवड्यात ही छापेमारी झाली आहे. जनावरांचं मांस बेकायदेशीरपणे विकलं जातं असल्याचा संशय गेल्या अनेक दिवसांपासून तेथिल यंत्रणांना होता. या कारवाईनंतर संशय खरा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसातील जास्त मास हे रस्त्यावरील कुत्रे व मांजरांचं असतं, असा दावा पोलिसांनी आधी अटक केलेल्या तीन आरोपींनी केला होता. दरम्यान, कुठल्याही निष्कर्षावर पोहचण्याआधी वैज्ञानिक परिक्षण करण्याचा सल्ला कोलकाता नगर निगमने दिला आहे.
ताज्या मांसाबरोबर एकत्र केलं जातं जनावरांचं मांस
छापेमारीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जनावरांच्या मांसाला केमिकलबरोबर 44 डिग्री सेल्सिअस तापमानात चार ते पाच दिवस रेफ्रिजरेट केलं जातं. त्यानंतर त्याला ताज्या मांसात मिसळून 20 किलोच्या वजनाची पाकिटं तयार केली जातात. अशी एकुण 1 हजार पाकिटं महागड्या हॉटेलमध्ये विकली जातात. केएमसीच्या अतिन घोष यांनी सांगितलं की, मांसाच्या तपासणीसाठी ते सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या संपर्कात आहे. या मांसाची चाचपणी सुरू आहे.