हेल्मेट निघाल्याने चाकात अडकले केस, गो कार्टींगदरम्यान बी. टेक विद्यार्थिनीचा मृत्यू
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 10, 2020 10:12 PM2020-10-10T22:12:38+5:302020-10-10T22:14:36+5:30
Hyderabad : श्रीवार्शिनी बुधवारी गुर्रम गुडा नावाच्या गो कार्टिंग ठिकाणी आपल्या कुटुंबासह गेली होती. कार्टिंग करत असताना अचानक तिचे हेल्मेट निघाले आणि तिचे केस गाडीच्या मागच्या चाकात अडकले.
हैदराबाद - तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथे एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. येथे गो कार्टिंग करताना हेल्मेट निघाल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हेल्मेट निघाल्याने तिचे केस गाडीच्या चाकात अडकले आणि हा भीषण अपघात घडला. श्रीवार्शिनी असे या तरुणीचे नाव आहे. ती 21 वर्षांची होती. ती बी. टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.
श्रीवार्शिनी बुधवारी गुर्रम गुडा नावाच्या गो कार्टिंग ठिकाणी आपल्या कुटुंबासह गेली होती. कार्टिंग करत असताना अचानक तिचे हेल्मेट निघाले आणि तिचे केस गाडीच्या मागच्या चाकात अडकले. गाडी वेगात असल्याने केस खेचले गेले आणि काही कळायच्या आत तिचे डोके गाडीच्या मागच्या बाजूला अदळले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या श्रीवार्शिनीला रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेच उपचारावेळी तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर श्रीवार्शिनीच्या कुटुंबीयांनी गो कार्टिंग संयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गो कार्टिंगदरम्यान संयोजकांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा जीव गेला, असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे संयोजकांनीही सर्व आरोप फेटाळून लावत गो कार्टिंग करताना श्रीवर्शिनीने सेल्फी काढण्यासाठी तिचे हेल्मेट काढले होते, असे म्हटले आहे. याप्रकरणी मीरपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढील तपास केला जात आहे, असे निरीक्षक महेंदर रेड्डी यांनी म्हटले आहे.