आलोक वर्मा यांच्या घरातून युवतीची सुटका; CBI संचालक की आणखी कोण याबाबत गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 09:28 AM2018-10-26T09:28:55+5:302018-10-26T09:30:15+5:30
दिल्ली पोलिसांसह महिला आयोगानेही हा व्यक्ती नेमका कोण, याबाबत गुप्तता बाळगल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली : सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमधील वाद आणि लाचखोरीच्या प्रकरणामुळे सध्या दिल्लीतील वातावरण तापलेले असताना आलोक वर्मा यांच्या घरातून बंदी बनविलेल्या एका काम करणाऱ्या युवतीला पोलीस आणि महिला आयोगाने सुटका केल्याचे वृत्त आहे. मात्र, दिल्ली पोलिसांसहमहिला आयोगानेही हा व्यक्ती नेमका कोण, याबाबत गुप्तता बाळगल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आलोक वर्मा नावाच्या व्यक्तीने आपल्या वसंत विहार येथील एका सदनिकेमध्ये घरकाम करण्यासाठी सुनिता टोम्पो या 20 वर्षांच्या मांडरच्या तरुणीला डांबून ठेवले होते. तिला गेल्या तिन महिन्यांपासून घरकामाचे पैसे दिले जात नव्हते, तसचे घरीही जाऊ दिले जात नव्हते.
हा वर्मा नावाचा व्यक्ती नेमका कोण, यावर सर्वांनीच गुप्तता बाळगली असल्याने संशयाची सुई सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याकडे वळत आहे. दिल्ली पोलिसांनी हे वृत्त नाकारले आहे. तर महिला आयोगाच्या मदतीने सुनिताला सोडविण्यात आले होते. मात्र, सीबीआय संचालकांच्या नावाची चर्चा व्हायला लागल्यानंतर आयोगाच्या सर्व सदस्यांनी आपले फोन बंद करून ठेवले आहेत. तर आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना फोन केला असता त्या दिल्लीत असूनही दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आल्याने हा व्यक्ती सीबीआय संचालकच असल्याचा संशय बळावला आहे.
सुनिता ही मांडरच्या नारो सरना गावातील राहणारी आहे. तीन महिन्यांपूर्वी तिला एका ओळखीच्या महिलेने संत नगरमध्ये प्लेसमेंट एजन्सीचालविणाऱ्या यमुना आणि अशोक यांना विकण्यात आले होते. या दोघांनी आलोक वर्मा यांच्या सदनिकेमध्ये घरकाम करण्यासाठी ठेवले होते. कामाच्या बदल्यात जे पैसे मिळत होते, ते यमुना आणि अशोक घेत होते, अशी माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी सुनिताला महिला सुधारगृहामध्ये पाठविले आहे.