भारत रशियाकडून घेणार २०० कामोव हेलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:28 PM2018-06-03T23:28:41+5:302018-06-03T23:28:41+5:30
रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.
नवी दिल्ली : रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेशी संबंधित पायाभूत तयारी करण्यात आली आहे. सरकारकडून आगामी चार महिन्यात या योजनेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबर २०१५ च्या मॉस्को दौऱ्यात या व्यवहाराबाबत दोन्ही देशात करारावर स्वाक्षºया झाल्या होत्या. आॅक्टोबर २०१६ मध्ये भारत आणि रशिया यांनी यासाठी दोन्ही कंपन्यांचा एक संयुक्त उपक्रम स्थापन करुन कराराला अंतिमत स्वरुप दिले. हा उपक्रम या हेलिकॉप्टरची निर्मिती करेल. हे हेलिकॉप्टर भारतात चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील.
मागील महिन्यात संरक्षण मंत्रालयाने या योजनेसाठी भारत- रशियाच्या संयुक्त उपक्रमासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) फॉर्म जारी केला होता. अधिकाºयांनी सांगितले की, संयुक्त उपक्रम या आरएफसीवर आॅगस्टपर्यंत विस्तृत उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये या व्यवहारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कमोव हेलिकॉप्टर हवाई दल आणि सैन्यासाठी दिले जाणार आहेत. वर्ष २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार, ६० कमोव २२६ हेलिकॉप्टर रशियातून तयार येणार असून उर्वरित १४० हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात होणार आहे. बंगळुरुजवळ तुमकूर येथे हेलिकॉप्टर निर्मितीसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.