प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:32 AM2024-01-05T10:32:53+5:302024-01-05T11:25:51+5:30

रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते.

200 men attack ED team raiding TMC leader's house in west Bengal | प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

कोलकाता - Attack on ED ( Marathi News ) देशात ईडी कारवाईवरून विरोधक सातत्याने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर करून भाजपा विरोधकांना टार्गेट करतं असा आरोप होतो. त्यात आता पश्चिम बंगालमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.याठिकाणी रेशन घोटाळ्याच्या आरोपातून ईडीकडून पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र सुरू आहे. त्यात शुक्रवारी ईडीची टीम उत्तर २४ परगणा इथं पोहचली. परंतु तिथे गावकऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना घेरलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. या जमावाने ईडीच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय सुरक्षा दलाच्या गाड्याचींही तोडफोड केली. 

ईडी टीमवरील हल्ल्याची ही घटना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावातील आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले होते. यावेळी सुमारे २०० लोकांच्या जमावाने ईडी टीमवर अचानक हल्ला केला. जमावाने ईडी अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यासाठी आलेल्या टीममध्ये ईडीच्या सहाय्यक संचालकाचाही समावेश होता. जमावाने त्यांची गाडीही फोडली.

यापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. वनमंत्री होण्यापूर्वी ज्योतिप्रिया मलिक यांनी अन्नमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. अंमलबजावणी संचालनालयाने या कथित घोटाळ्यात तांदूळ मिल मालक बाकीबुर रहमान याला अटक केली होती. २००४ मध्ये राईस मिल मालक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या रहमानने पुढील दोन वर्षांत आणखी तीन कंपन्या स्थापन केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रहमानने कथितरित्या शेल कंपन्यांची मालिका उघडली आणि पैसे काढले.

दरम्यान, याआधीही टीएमसी नेत्यांवर ईडीचे छापे पडले आहेत. तपास यंत्रणेने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात चौकशी केली आहे. बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना २०२२ मध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Web Title: 200 men attack ED team raiding TMC leader's house in west Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.