मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे २ हजार जवान; ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 06:33 IST2024-12-04T06:33:30+5:302024-12-04T06:33:53+5:30
मैतेई समुदायाच्या गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या लैशराम कमलबाबू सिंह या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लष्कराचे दोन हजार जवान करण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे २ हजार जवान; ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत
इम्फाळ : मैतेई समुदायाच्या गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या लैशराम कमलबाबू सिंह या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लष्कराचे दोन हजार जवान करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी ड्रोन, लष्करी हेलिकॉप्टर, श्वानपथक यांचीही मदत घेण्यात येत आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात ५७ व्या माऊंटन डिव्हिजनच्या लामाखॉन्ग मिलिटरी स्टेशनमध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेससोबत (एमइएस) ते एका कंत्राटदारासाठी सुपरवायझर म्हणून काम करत होते.
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सांगितले की, लष्कराच्या छावणीतून लैशराम बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्याची जबाबदारी लष्कराने स्वीकारली पाहिजे. लैशराम २५ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. पोलिसांच्या सहकार्याने लष्कराने शोध सुरू केला आहे. ते बेपत्ता झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य लष्करी छावणीपासून अडीच किमी दूर असलेल्या कांटो सबल येथे उपोषणाला बसले आहेत. त्यात लैशराम यांच्या पत्नी अकोडजाम बेलारानी याही सहभागी झाल्या. कांगपोकपी जिल्ह्यामध्ये ही लष्करी छावणी असून गेल्या वर्षी मे मध्ये उसळलेल्या संघर्षात या भागातील मैतेइ समुदायाच्या लोकांनी पलायन केले होते. दहशतवाद्यांनी लैशराम यांचे अपहरण केले असावे, असा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
एफएमआर रद्द केल्याविरोधात निदर्शने
भारत-म्यानमारमधील फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ चुराचंदपूर जिल्ह्यात मंगळवारी युनायटेड झोऊ ऑर्गनायझेशन (यूएझओ) या संस्थेच्या वतीने मंगळवारी निदर्शने करण्यात आली.