उद्यापासून २००० ची नोट बँकेत जमा करता येणार; काय करायचे - काय नाही, RBI गव्हर्नरनी स्पष्ट सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:57 PM2023-05-22T12:57:09+5:302023-05-22T13:07:01+5:30
बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे
नवी दिल्ली - आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर आता २३ मे पासून म्हणजे उद्यापासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २००० नोटा बदलण्यावरून लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले आहे. लोकांकडे ४ महिन्यांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजाराची नोट पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. सध्या बाजारात असलेल्या २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये येण्याची शक्यता आहे. करन्सी मॅनेटमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. २ हजाराच्या नोटा लीगल टेंडर राहतील असंही आरबीआयने म्हटलं आहे.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ज्यांच्याकडे २००० रुपयांची नोट आहे तो ती त्याच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा इतर कोणत्याही मूल्याच्या चलनात बदलू शकतो. बँकांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत २००० रुपयांच्या बहुतांश नोटा परत मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. “सिस्टीममध्ये आधीच पुरेशी रोकड आहे. रिझव्र्ह बँकेकडेच नाही तर बँका चालवल्या जाणाऱ्या करन्सी चेस्टमध्येही पुरेशी रोकड आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. रिझर्व्ह बँक लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केंद्रीय बँक गरज पडल्यास नियमन आणेल असा दिलासाही आरबीआयने दिला.
२००० रुपयांची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होईल. कारण एकूण चलन चलनात त्याचा वाटा फक्त १०.८ टक्के आहे. २०१६ च्या नोटाबंदीनंतर काढलेल्या चलनाची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांची नोट सादर करण्यात आली होती. आमच्याकडे पुरेशा नोटा आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सध्याच्या नियमांनुसार, ५०००० रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅन द्यावा लागतो. २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याच्या प्रक्रियेतही ही व्यवस्था सुरूच राहणार असल्याचे दास यांनी सांगितले.
शक्तिकांत दास यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
२००० रुपयांची नोट बदलताना गोंधळून जाऊ नका
२००० च्या नोटा आणण्याचा उद्देश पूर्ण झाला
बँका २००० रुपयांच्या नोटांची संपूर्ण माहिती ठेवतील
नोटा बदलण्यासाठी ४ महिने
सध्याच्या नियमांनुसारच नोटा जमा केल्या जातील
२००० च्या नोटांची छपाई थांबली आहे.
५०००० हजारांपेक्षा जास्त ठेवींवर माहिती द्यावी लागेल.