2000 रुपयांची नोट बंद होणार? ससंदेत भाजप खासदारानेच केली मागणी; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:41 PM2022-12-12T13:41:54+5:302022-12-12T13:43:11+5:30
भाजप खासदार सुशील मोदी यांनी 2000 रुपयांची नोट बंद करण्याची मागणी केली आहे.
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार सुशील मोदी यांनी देशात 2000 रुपयांच्या नोटांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला आणि काळा पैसा म्हणून नोटा साठवल्या जात असल्याचा आरोप केला. पीएसयू बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत केंद्राला याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी या नोटेवर बंदी घातली पाहिजे, असे सुशील मोदी म्हणाले. फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
2000ची नोट बंद करावी
राज्यसभेत सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले की, 2000 ची नोट म्हणजे काळा पैसा. 2000 ची नोट म्हणजे होर्डिंग. देशातील काळा पैसा थांबवायचा असेल तर 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घालावी लागेल. आता 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे कोणतेही औचित्य नाही. मी भारत सरकारला विनंती करतो की टप्प्याटप्प्याने 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात यावी.
नोटा साठवणुकीचा आरोप
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला नोटाबंदीच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त माजी आर्थिक व्यवहार सचिव एस. सी गर्ग म्हणाले होते की 2,000 रुपयांच्या नोटेवर बंदी घालावी. त्यांनी दावा केला होता की, 2,000 रुपयांच्या नोटांचा साठा केला जातोय आणि हे थांबवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी याच दिवशी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. काळ्या पैशाला आळा घालणे, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि देशाला रोखरहित अर्थव्यवस्था बनवणे हा त्या मागचा उद्देश होता.
2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती, त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर पाचशेची नवी नोट आली आणि एक हजाराच्या नोटेऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. नोटाबंदीमुळे काळा पैसा आणि दहशतवादाला आळा बसेल, असे तेव्हा म्हटले जात होते.