हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:39 PM2019-10-14T12:39:19+5:302019-10-14T12:40:47+5:30
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
नवी दिल्ली - हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे चर्चा झाली. ही चर्चा फिस्कटल्याने देशभरातील 9 प्रभागांतील जवळपास 20 हजार कर्मचारी सोमवारपासून (14 ऑक्टोबर) बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेने पत्रकाद्वारे दिली.
एचएएल व्यवस्थापनाने कामगारांची निराशा केली असून, अधिकारी वर्गाला भरघोस वेतनवाढ दिली. मात्र, कामगारांना तुटपुंजी वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिल्याचे समजताच संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 34 महिन्यांपासून अधिकारी वर्ग वाढीव पगाराचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएलचे उच्च व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही लष्करी विमान निर्मिती करणारी कंपनी आहे. कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ व इतर मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. आस्थापनेप्रति कामगार प्रामाणिक असून, कंपनी जर आर्थिक संकटात असेल तर अधिकारीवर्गाला दिलेली वेतनवाढ रद्द करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांची वेतनवाढ करावी, अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे.
नाशिकमध्ये एचएएल कामगारांच्या प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून हजारो एचएएल कामगार मेनगेट येथे (व्हेईकल गेट) येथे थांबून विविध घोषणा देत आहेत. तसेच भजन कीर्तनाच्या माध्यमातून संप यशस्वी करण्यासाठी कामगार जागृती करण्यात येत आहे.