2002मधल्या नरोदा पाटिया दंगलप्रकरणी बाबू बजरंगीला जन्मठेप, माया कोडनानींची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 11:38 AM2018-04-20T11:38:30+5:302018-04-20T11:38:30+5:30
2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
अहमदाबाद- 2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. तर माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबू बजरंगीला शेवटच्या श्वासापर्यंत जेलमध्ये राहावं लागणार आहे. माया कोडनानी यांची 28 वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. बाबू बजरंगीबरोबर हरेश छारा, सुरेश लंगडा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे.
तत्पूर्वी या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं होतं. 16 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारी 2002मध्ये अहमदबादेतल्या नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल उसळली होती. 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळल्यानंतर दुस-या दिवशी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया भागात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया येथे 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यात 33 लोक जखमी झाले होते.
2002 Gujarat riots case(Naroda Patiya): Gujarat High Court acquits Maya Kodnani, Babu Bajrangi's conviction upheld. pic.twitter.com/XPCejIsE64
— ANI (@ANI) April 20, 2018
गुजरातमधल्या दंगलीचा सर्वाधिक फटका हा नरोदा पाटिया भागाला बसला होता. 2002मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोदा पाटिया येथील दंगल विशेष गाजली होती. या दंगलीत 97 जणांना ठार करण्यात आलं होतं. माया कोडनानी यांना या प्रकरणात 28 वर्षांची शिक्षा झाली होती. दंगल उसळली त्या वेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने त्यावेळी ठेवला होता.