पहिल्या तिमाहीत जीडीपी २०.१ टक्के; सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:10 AM2021-09-01T08:10:44+5:302021-09-01T08:10:57+5:30
यंदाच्या वित्तीय वर्षात देशाचा विकास दर ९.५ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते.
नवी दिल्ली : २०२१-२२ या वित्तीय वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर २०.१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या तिमाहीतील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाशी (जीडीपी) संबंधित आकडेवारी सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली.यंदाच्या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर २१.४ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला होता.
२०२०-२१ च्या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये कोरोनाची साथ व लॉकडाऊनमुळे देशाचा विकास दर -२४.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. त्या तुलनेत यंदाच्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दराने मोठा पल्ला गाठला आहे. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती खूप चांगली झाली आहे, असा कोणीही समज करून घेऊ नये, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी वेगाने राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम, केंद्र सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच निर्यात वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे देशातील वित्तीय वातावरण बदलण्यास मदत होत आहे.
यंदाच्या वित्तीय वर्षात देशाचा विकास दर ९.५ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. त्याआधी १०.५ टक्के इतक्या विकासदराचे भाकीत रिझर्व्ह बँकेने केले होते. जागतिक बँकेने मात्र भारताचा विकास दर ८.३ टक्के राहील, अशी शक्यता वर्तविली होती. २०२१ साली जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर ५.६ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.