Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची वेळ ठरली, 22 जानेवारीला लटकवणार फासावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:52 PM2020-01-07T16:52:30+5:302020-01-07T17:09:43+5:30
Nirbhaya Case : कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत वारंवार फाशीच्या शिक्षेला हुलकावणी देणाऱ्या निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची तारीख निश्चित झाली आहे.
नवी दिल्ली - कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत वारंवार फाशीच्या शिक्षेला हुलकावणी देणाऱ्या निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची तारीख निश्चित झाली आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत त्यांच्या डेथ वॉरंटवर शिक्कामोर्तब केले आहे. त्याबरोबरच निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही क्रूर गुन्हेगारांच्या मृत्यूची वेळ निश्चित झाली असून, त्यांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटकवण्यात येईल.
2012 Delhi gangrape case: A Delhi court issues death warrant against all 4 convicts, execution to be held on 22nd January at 7 am https://t.co/K4JCAM0RJa
— ANI (@ANI) January 7, 2020
२०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४ जणांना फाशी देण्याची प्रक्रिया त्वरेने करावी तसेच त्यांच्याविरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट काढावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने निकाल दिला. आज निकाल देताना कोर्टाने आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत त्यांच्या डेथ वॉरंटवर शिक्कामोर्तब केले. तसेच अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय शर्मा या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळा 7 वाजता फाशी देण्यात येईल, असा निकाल दिला. तसेच दोषींना या निकालाविरोधात कायदेशीर मदत घेण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दरम्यान, या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे दोषींच्या वकिलांनी सांगितले आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court says, the convicts can use their legal remedies within 14 days
— ANI (@ANI) January 7, 2020
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून जबर जखमी अवस्थेत बसमधू बाहेर फेकण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर सिंगापूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारात चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तयारी यापूर्वीच केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नुकतेच पूर्ण केले आहे.