Lok Sabha Election 2019: च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 09:05 AM2018-08-10T09:05:40+5:302018-08-10T09:07:02+5:30
Lok Sabha Election 2019 :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणाशीही आघाडी करणार नसल्याचंही अरविंद केजरीवालांनी स्पष्ट केलं. केजरीवालांनी हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या सभेला संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
अनेक पक्ष महागठबंधनमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी देशाच्या विकासात कोणतीच भूमिका बजावलेली नाही असे ही केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या विकासात केंद्र सरकार हस्तक्षेप करून आडकाठी आणत असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला आहे. मी कोणत्याही महाआघाडीमध्ये सहभागी होणार नाही. दिल्लीतली अनेक कामे रखडण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. दिल्लीतल्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत आम्ही भरपूर काम केलं आहे. भाजपा हा पक्ष धर्माच्या नावाखाली लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना लोकांच्या भावनांशी काहीही देणं-घेणं नाही. तसेच केजरीवालांनी हरियाणातल्या भाजपा सरकारवरही टीका केली.
दिल्लीच्या बरोबरीत हरियाणाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी खरा विकास कसा करावा हे आमच्याकडून शिकावं. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसतानाही आम आदमी पार्टीनं वीज, पाणी आणि आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत क्रांतिकारी काम केलं आहे. हरियाणातलं खट्टर सरकार असा विकास का करू शकत नाही, असा प्रश्नही केजरीवालांनी विचारला आहे. तसेच अंबालाच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना खट्टर सरकारनं 1 कोटींची आर्थिक मदत करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.