हे आहेत काँग्रेसचे अब्जाधीश उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:10 PM2019-03-23T16:10:46+5:302019-03-23T16:11:43+5:30
तेलंगणामधील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे तेलुगू भाषिक राज्यांतील सर्वांत श्रीमंत नेते आहेत.
हैदराबाद - तेलंगणामधील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे तेलुगू भाषिक राज्यांतील सर्वांत श्रीमंत नेते आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरताना रेड्डी यांनी त्यांची आणि कुटुंबियांची संपत्ती एकूण 895 करोड रुपये दाखवली आहे.
न्यूज एजेंसीच्या रिपोर्टनुसार रेड्डी यांच्याकडे 223 करोड आणि त्यांची पत्नी संगीता रेड्डी यांच्याकडे 613 करोड रुपयांची संपत्ती आहे. संगीता रेड्डी या अपोलो रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय विश्वेश्वर रेड्डी यांच्या मुलांच्या नावाने 20 करोडची संपत्ती आहे. निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीनुसार रेड्डी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं वाहन नाही.
विश्वेश्वर रेड्डी यांनी इंजिनिअर पूर्ण करुन राजकारणात प्रवेश केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)च्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती 528 करोड घोषित करण्यात आली होती. डिसेंबर 2018 मध्ये विश्वेश्वर रेड्डी यांनी टीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विश्वेश्वर रेड्डी यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे कॅबिनेट मंत्री पी नारायण यांनी नेल्लोर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांनी निवडणूक अर्जात 667 करोड संपत्ती असल्याचं नमूद केलंय. पी नारायण हे नारायण ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे मालक आहेत. तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांची कौटुंबिक मालमत्ता 574 करोड आहे. तर वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि त्यांची पत्नी यांची संपत्ती 538 करोड असल्याचं सांगितले आहे.