लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 50 जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:01 AM2018-03-16T10:01:29+5:302018-03-16T10:01:29+5:30
गेल्या निवडणुकीत 80 जागांपैकी 73 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर येथील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने अनेक वर्षांचे शत्रुत्त्व विसरून भाजपाविरोधात युती केली होती. त्यामुळे भाजपाला गोरखपूर आणि फुलपूर या प्रतिष्ठित मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला लोकसभेच्या 50 जागा गमवाव्या लागतील, अशी शक्यता आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ आघाडीने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी सपा आणि बसपा स्वतंत्र लढले होते. परंतु, आताच्या पोटनिवडणुकांप्रमाणे सपा आणि बसपाने पुढील लोकसभा निवडणुकांमध्येही युती केल्यास 80 पैकी 57 जागांवर त्यांना फायदा होईल. यावेळच्या पोटनिवडणुकीत बसपाची मते मोठ्याप्रमाणावर सपाकडे वळाली होती. हा ट्रेंड आगामी निवडणुकीत कायम राहू शकतो. त्यामुळे सपा-बसपा युतीला 50 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. याउलट भाजपाला केवळ 23 जागांवरच समाधान मानावे लागेल.
पोटनिवडणुकीतील विजयानंतर अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले. पण तेवढ्याने दोन्ही पक्षांतील आनंद थांबला नाही. मायावती यांनी आपली काळ्या रंगाची मर्सिडीज अखिलेश यांच्याकडे पाठवली. त्यात बसून अखिलेशही लगेच मायावती यांना भेटायला गेले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाढते सख्य भाजपासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीदेखील सपाला एवढे यश मिळेल, याची कल्पना आम्ही केली नव्हती, अशी कबुली दिली होती. मात्र, भविष्यात विरोधक एकत्र येतील हे ग्राह्य धरून रणनीती आखणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.