२०२ उमेदवार कोट्यधीश
By admin | Published: May 13, 2016 04:24 AM2016-05-13T04:24:00+5:302016-05-13T04:24:00+5:30
केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून
नवी दिल्ली : केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून, ३११ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर)तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ११२५ उमेदवार आहेत. कोट्यधीश उमेदवारांत काँग्रेसचे ४३, माकपाचे २४, भाजपाचे १८, भारत धर्म जनसेनेचे १८, अण्णा द्रमुकचे २, आययूएमएलचे १७, केरळ काँग्रेसचे (एम) ९ आणि ३० अपक्ष यांचा समावेश आहे. दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकूणच उमेदवारांची सरासरी संपत्ती १.२८ कोटी रुपयांची आहे.
रिंगणातील ११२५ उमेदवारांपैकी ३११ जणांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे नोंदले गेल्याचे स्वत:च जाहीर केले आहे. त्यात माकपाचे ७२, भाजपाचे ४२, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ३७१, भारत धर्म जनसनेचे १३, माकपचे १५, आययूएमएलचे ६, एसडीपीआयचे २५ आणि ४३ अपक्ष असे वर्गीकरण आहे.
> केरळ-सोमालिया तुलनेमुळे संताप
तिरूअनंतपुरम : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात केरळची तुलना सोमालियाशी केल्याबद्दल आणि संबंधित वक्तव्य मागे न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री ओमन चांडी आणि माकपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.मोदींनी केरळमधीलच नव्हे, तर जगातील मल्याळी समुदायाचा अवमान केला आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन आपली ‘राजकीय शालीनता’ दाखवावी. ही तुलना ‘आधारहिन आणि वस्तुस्थिती’च्या विरुद्ध आहे. चांडी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोदी यांनी मौन स्वीकारले असून, केरळच्या जनतेला त्यांचे मौन नव्हे, तर बिनशर्त माफी पाहिजे. मोदी यांनी निवडणूक सभेत राज्यातील आदिवासींच्या बालमृत्युदराची तुलना आफ्रिकेतील सोमालिया या देशाशी केली होती.
>१0४ महिला रिंगणात
११२५ पैकी ४९६ उमेदवारांनी ‘पॅन’चा तपशील दिलेला नाही. तर ८३४ जणांनी त्यांचा प्राप्तीकराचा तपशील जाहीर केलेला नाही. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता ६६९ उमेदवार पाचवी ते १२ उत्तीर्ण आहेत. ३८० जणांनी पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले आहे. २९ जण केवळ साक्षर आहेत. ७ जण निरक्षर आहेत. या सर्वांनी शपथपत्रातच ही माहिती दिली आहे. ६ उमेदवार ८० पेक्षा जास्त वयाचे असून दोघांनी त्यांचे वय जाहीर केलेले नाही. या वेळी १०४ महिला उमेदवार त्यांचे भवितव्य अजमावत आहेत.
> माकपचे टीकास्त्र : मोदी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर माकपनेही हल्लाबोल केला आहे. माकपचे महासचिव कोडियारी बाळकृष्ण म्हणाले की, राज्याची स्थिती सोमालियातील स्थितीशी होऊ शकत नाही. मोदींच्या वक्तव्याने राज्यातील जनतेचा अपमान झाला असून, निवडणुकीत जनता भाजपाला झटका दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सोमालियासारखी स्थिती नाही, हे पंतप्रधानांनी समजून घेतले पाहिजे. ज्या राज्यात मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झालेला आहे.