2020 पर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेने जोडली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:31 PM2018-05-12T12:31:29+5:302018-05-12T12:31:29+5:30
ईशान्य भारताचे स्थान लक्षात घेता येते वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने येत्या दोन वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये रेल्वेची सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्च करुन ईशान्य भारतातील रेल्वेसेवेचे जाळे अधिक दृढ चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील 795 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. यामुळे चीनच्या सीमेपर्यंत भारतीय नागरिकांना आणि लष्कराला वाहतूक करणे सोपे जाणार आहे. त्याबरोबरच बोगीबील हा अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील पूल लवकरच खुला होणार आहे. या पुलामुळेही रेल्वेला अरुणाचल प्रदेशात सेवा देणे सोपे जाणार आहे.
आसाम , अरुणाच प्रदेश आणि त्रिपुरा सध्या रेल्वेने जोडली गेले आहेत. मात्र मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम, नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेल्या नाहीत. भैराबी आणि सायरंग या 51.38 किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐजॉल जोडण्यात येणार आहे. सायरंग हे ऐजॉलपासून 18 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. रांगपोपासून गंगटोक 40 किमी अंतरावर आहेय
ब्यारनिहाट ते शिलाँग या मेघालयातील रेल्वेमार्गाचे काम खासी विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे बंद पडले आहे. या प्रदेशात जमिन अधिग्रहणासाठी रेल्वेला अद्याप ना हरकत प्रमामपत्र मिळालेले नाही. खासी हिल्स अटोनोमस डिस्ट्रीक्ट कौन्सीलने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.
सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या सिक्किममध्ये सुरु आहे. तो पूर्ण होण्याआधीच पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आला आहे. त्यामुळे सिक्किमवासियांना विमानसेवा आणि रेल्वेसेवा एकापाठोपाठ एक मिळत आहेत. सिक्किम हे एकमेव राज्य होते की ज्यामध्ये आजवर विमानतळ नव्हता. पाक्योंग विमानतळ हा भारत चीन सीमेजवळ असल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उडान योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले पाक्योंग हे विमानतळ भारतातील 100 वे विमानतळ ठरले आहे.