2020 पर्यंत वन्यप्राण्यांची संख्या 67 टक्क्यांनी घटणार
By Admin | Published: October 27, 2016 02:54 PM2016-10-27T14:54:43+5:302016-10-27T15:45:32+5:30
मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण, अवैध शिकार आणि मानवी अतिक्रमण यामुळे गेल्या काही काळापासून वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालामधून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
1970 ते 2012 या काळात जगभरातील मासे, पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर आणि सरीसृप प्राण्यांची एकूण संख्या 58 टक्क्यांनी घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अर्धशतकापासून वन्य प्राण्यांची संख्या सातत्याने घटत असून 2020 पर्यंत वन्यजिवांची संख्या दोन तृतियांशने घटण्याची भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.
मानवी हस्तक्षेपाचे पृथ्वीवर होत असलेले दुष्परिणाम या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, त्यात बदल होण्याची गरज असल्याचेही मत मांडण्यात आले आहे. तसेच मानवी हस्तक्षेपाचा वन्यजिवांच्या अधिवासावर थेट परिणाम होत असल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे.
"संशोधकांनी या काळाला याआधीच अँथ्रोपोसिन असे नाव दिले आहे. ज्या काळात मानवाकडून होणाऱ्या कृतींमुळे जागतिक तापमान आणि पर्यावरणात बदल होणार आहे,"असेही या अहवालात म्हटले आहे.