शिक्षण विकास महामंडळाने १८ वर्षात दिले २०४ कोटींचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:30 PM2023-11-24T17:30:29+5:302023-11-24T17:42:58+5:30
याबाबत माहिती देण्यासाठी गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत घेतली.
नारायण गावस, पणजी: उच्च शिक्षण घेण्यासाठी गोवा शिक्षण महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या व्याजमुक्त कर्जाचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. गोवा शिक्षण विकास महामंडळातर्फे २००५ ते आतापर्यंत एकूण ९ हजार ७३३ विद्यार्थ्यांना २०४ कोटींचे कर्ज दिलेले आहेत. यामुळे गोमंतकीय विद्यार्थ्याची उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार झाली, अशी माहिती गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी काल पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा शिक्षण विकास महामंडळाच्या व्यावस्थापकीय संचालिका वर्षा नाईक, सहायक व्यावस्थापक ब्रिजेश शिरोडकर उपस्थित होते.
उत्पन्न मर्यादेत वाढ या व्याजमुक्त कर्जासाठी आता उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली आहे. या योजनेत दुरुस्ती करणारी अधिसूचना बुधवारी काढण्यात आली असून, त्यानुसार देशात जर एखाद्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल तर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून १२ लाख करण्यात आली आहे. पूर्वी ती सात लाख रुपये होती. तसेच विदेशातील एखाद्या संस्थेत उच्च शिक्षण घेत असल्यास विद्यार्थ्यांच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवून २० लाख रुपये केली आहे, पूर्वी ती १२ लाख रुपये होती. ही सुधारीत योजना २७ नोव्हेंबरपासून सुरू होत असून २९ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, असे गोविंद पर्वतकर यांनी सांगितले.
एखादा अपघात घडल्यास कर्ज माफ महामंडळाकडून कर्ज घेऊन शिक्षण घेत असलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास तसेच नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाकडून तो कर्ज फेड करुन घेतला जाणार नाही. ते कर्ज माफ केलं जाणार आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका वर्षानंतर विद्यार्थ्यांना कर्जांचे हफ्ते भरावे लागणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने कर्ज भरले नाही तर १० टक्के व्याजदर आकारले जाणार आहे, सरकारी कर्ज म्हणून माफ केलं जाणार नाही, असेही यावेळी गोविंद पर्वतकर यांनी नमूद केले.