गरीब मुलींच्या विवाहाला २०४ कोटी
By admin | Published: September 23, 2016 01:26 AM2016-09-23T01:26:42+5:302016-09-23T01:26:42+5:30
तामिळनाडूतील जयललिता सरकारने गरीब मुलींच्या विवाहाला साहाय्य करण्यासाठी ‘तालिकू तंगम’ (पवित्र मंगळसूत्रासाठी सोने) ही २०४ कोटी रुपयांची योजना सुरू केली.
चेन्नई : तामिळनाडूतील जयललिता सरकारने गरीब मुलींच्या विवाहाला साहाय्य करण्यासाठी ‘तालिकू तंगम’ (पवित्र मंगळसूत्रासाठी सोने) ही २०४ कोटी रुपयांची योजना सुरू केली.
चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी २०४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, याचा १२ हजार ५०० महिलांना लाभ होणार असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले.
या योजनेंतर्गत गरीब आई-वडील, विधवा आणि इतरांच्या मुलींना लग्नासाठी सोने आणि इतर स्वरूपाचे साहाय्य करण्यात येते. लाभार्थी मुलगी दहावी उत्तीर्ण असेल, तर तिला २५ हजार रुपये आणि पदवीपूर्व शिक्षण किंवा पदविकाधारक असल्यास तिला ५० हजार रुपयांचे साहाय्य करण्याचीही यात तरतूद आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
सत्ताधारी अण्णा द्रमुकने २०११ च्या निवडणुकीदरम्यान गरीब मुलींच्या विवाहासाठी चार ग्रॅम सोने देण्याचे, तर गेल्या निवडणुकीदरम्यान ते वाढवून ८ गॅ्रम करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करीत, मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी ही वाढीव योजना सुरू केली आणि पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी ८ ग्र्रॅम वजनाचे नाणे दिले. हे लाभार्थी त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या डॉ. राधाकृष्णनगरसह कांचीपुरम येथील रहिवासी आहेत. (वृत्तसंस्था)