जूनमध्ये महिलांविरुद्ध सर्वाधिक २०४३ तक्रारी; महिला आयोगाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:30 AM2020-07-04T04:30:11+5:302020-07-04T04:30:36+5:30
आठ महिन्यांतील सर्वाधिक संख्या
नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाला (एनसीडब्ल्यू) जूनमध्ये महिलांविरुद्धच्या २०४३ तक्रारी मिळाल्या आहेत. ही संख्या गत आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे.
एनसीडब्ल्यूने दिलेल्या माहितीनुसार, केवळ जूनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ४५२ तक्रारी मिळाल्या आहेत. एकूण २०४३ तक्रारी मिळाल्या असून छळाच्या ६०३ तक्रारी आहेत. या आकडेवारीनुसार, गत वर्षी सप्टेंबरनंतर यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. गतवर्षी सप्टेंबरमध्ये एनसीडब्ल्यूला २३७९ तक्रारी मिळाल्या होत्या.
एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, सोशल मीडिया आता खूपच सक्रिय असल्याने तक्रारींची संख्या वाढली आहे. आता टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रारी दाखल करता येतात. तक्रारी दाखल करण्यासाठी आम्ही व्हॉटस्अॅप नंबर दिलेला आहे. लोकांना माहीत आहे की, आम्ही मदत करीत आहोत आणि त्यामुळे त्यांना आमच्यावर विश्वास आहे. या आकडेवारीनुसार, विवाहित महिलांचा छळ आणि हुंड्यासाठी छळाच्या २५२ आणि विनयभंगाच्या १९४ तक्रारी मिळाल्या आहेत. महिलांप्रती पोलिसांच्या अनास्थेच्या ११३ आणि महिलांविरुद्ध सायबर गुन्ह्याच्या १०० तक्रारी मिळाल्या आहेत. बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या ७८ आणि लैंगिक छळाच्या ३८ तक्रारी मिळाल्या आहेत. जूनमध्ये आयोगाने हुंडाबळीच्या २७ आणि विवाहासंबंधी आणि आॅनर किलिंग वा त्या संबंधीच्या ४५ तक्रारी मिळाल्या आहेत.