उड्डाणपूल कोसळून २१ ठार
By admin | Published: April 1, 2016 05:05 AM2016-04-01T05:05:38+5:302016-04-01T05:05:38+5:30
उत्तर कोलकाताच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर दोन कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत.
कोलकाता : उत्तर कोलकाताच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर दोन कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत. अनेक वाहने, फेरीवाले आणि पादचारी ढिगाऱ्याखाली दबले असल्याने १५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. गुरुवारी दुपारी कोलकात्यातील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या बडाबाजारजवळील टागोर मार्गावर ही घटना घडली आणि शहरात हाहाकार उडाला. अतिशय दाट वस्ती असलेला हा भाग आहे.
जखमींना लगतच्या परिसरातील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पुलाचा काही भाग कोसळत असताना अनेक लोक, कार, आॅटोरिक्षा आणि हॉकर्स ढिगाऱ्याखाली दबत असल्याचे तर काही जण पळून जात असताना अचानक त्यात अडकल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. अनेकांनी आरडाओरड करीत सुरक्षित स्थळी धाव घेतली तर काही लोक ढिगाऱ्याखाली दबून रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करीत असल्याचे आणि मदतीसाठी धावून जाणारे त्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवित असल्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. (वृत्तसंस्था)
राव म्हणतात, देवाने केलेले कृत्य...
हे दुसरे काही नसून देवाने केलेले कृत्य आहे, असा दावा हैदराबादच्या आयव्हीआरसीएल बांधकाम कंपनीचे पांडुरंग राव यांनी केल्यामुळे चौफेर टीका होऊ लागली आहे. यापूर्वीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने २००९ मध्ये संबंधित निविदा मंजूर केल्या होत्या.
अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही हैदराबादच्या उपरोक्त कंपनीने सरकारला बांधकामासंबंधी विस्तृत आराखडा दिलेला नव्हता, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. प. मिदनापूर जिल्ह्णातील निवडणूक प्रचार अर्धवट सोडून त्या कोलकात्यात परतल्या.
तृणमूल काँग्रेस - डाव्यांचा ब्लेम गेम...
सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत ब्लेम गेम सुरू केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असताना सदर फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
पाच लाखांची मदत...
राज्य सरकार मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना तीन लाख रुपयांची मदत देण्यासह जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या मदतीसाठी पथक पाठविण्याचे आदेश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला दिले.
मोदींना दु:ख; केंद्राकडून मदत...
कोलकात्यातील दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख झाल्याचे नमूद करतानाच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत जाहीर केली आहे. ते सध्या अमेरिकेच्या भेटीवर असून त्यांनी टिष्ट्वटरवरून प्रतिक्रिया दिली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मोदींना फोनवरून सदर घटनेबाबत माहिती दिली.