एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:11 PM2024-06-20T13:11:41+5:302024-06-20T13:12:06+5:30
२०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वायुप्रदूषणामुळे जगभरात २०२१ साली ८१ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भारतातील २१ लाख व चीनमधील २३ लाख मृतांचा समावेश होता, असे युनिसेफ व अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालात म्हटले आहे.
२०२१ साली वायुप्रदूषणामुळे पाच वर्षे वयाखालील मुले मोठ्या संख्येने मरण पावली. हा आकडा भारतात १,६९,४००, पाकमध्ये ६८,१०० होता. दक्षिण आशियामध्ये वायूप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले.
काय करावे लागेल?
हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अध्यक्षा एलेना क्राफ्ट यांनी सांगितले की, अहवालाच्या निष्कर्षांमुळे जनजागृती होईल व प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल. वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. ते प्रमाण कमी होण्यासाठी देशांनी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे, असेही क्राफ्ट यांनी सांगितले.
नेमका कुणाला फटका?
हे प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात विविध उपाय योजण्यात येत असले तरी ते पुरेसे नाहीत. लहान मुले,
युवक, मध्यमवयीन लोक, वृद्ध व्यक्ती यांना वायुप्रदूषणामुळे खूप त्रास सोसावा लागतो.