२१३ कोटींच्या दंडाला ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:38 AM2024-11-20T11:38:12+5:302024-11-20T11:39:02+5:30
२०२१ मध्ये व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाचे अपडेट्स आणताना अनुचित व्यावसायिक पद्धतींचा वापर केल्याच्या आरोपाप्रकरणी सीसीआयने सोमवारी मेटाविरुद्ध ही कारवाई केली.
नवी दिल्ली : फेसबुक आणि व्हॉट्सॲपची पालक कंपनी ‘मेटा’ला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) २१३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, कंपनीवर प्रतिबंधही लावला आहे. या कारवाईविरुद्ध अपील करण्याचा निर्णय कंपनीने घेतला.
२०२१ मध्ये व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाचे अपडेट्स आणताना अनुचित व्यावसायिक पद्धतींचा वापर केल्याच्या आरोपाप्रकरणी सीसीआयने सोमवारी मेटाविरुद्ध ही कारवाई केली. कंपनीवर स्पर्धाविरोधी कृत्य केल्याचा ठपका आयोगाने ठेवला. कंपनीला स्पर्धाविरोधी कारवाया बंद करून स्पर्धा संपविणाऱ्या बाबींवर उपाय योजना करण्याच्या सूचनाही आयोगाने
केल्या.
कंपनीचे म्हणणे काय?
सुधारणांमुळे लोकांच्या खासगी संदेशांच्या गोपनीयतेत कोणताही बदल झालेला नाही. वापरकर्त्यांना एक पर्याय म्हणून यासंबंधीचे अपडेट्स देण्यात आले होते.
या अपडेटमुळे कोणाचेही खाते डिलिट होणार नाही, तसेच सेवा खंडित होणार नाही, याची काळजीही आम्ही तेव्हा घेतली आहे. मेटाने म्हटले की, २०२१ च्या अपडेट्स व्हॉटसॲपवर पर्यायी व्यावसायिक सुविधा सुरू करण्यासाठी आहे.