यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले २१३ नवे राजकीय पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:19 AM2019-05-22T05:19:16+5:302019-05-22T05:19:19+5:30
संख्या गेली ६७७ वर; १० वर्षांत ३०० नव्या पक्षांची झाली नोंदणी
नवी दिल्ली : सन २००९ च्या तुलनेत आताच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २१३ नवे राजकीय पक्ष उतरल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. गेल्या १० वर्षांत निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या राजकीय पक्षांच्या संख्येत सुमारे ३०० ने वाढ झाली आहे.
आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सन २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या ३६८ होती. सन २०१४ मध्ये ती वाढून ४६४ झाली व आताच्या लोकसभा निवडणुकीत ती ६७७ वर पोहोचली. नव्या पक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली ८४ टक्के वाढ ही लक्षणीय आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुुकीच्या आधी नव्या राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे जणू पेवच फुटले. एप्रिल २०१८पर्यंत निवडणूक आयोगाकडे सुमारे दोन हजार अमान्यताप्राप्त पक्ष नोंदलेले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणखी २३८ नवे पक्षांची नोंदणी झाली आणि आणखी २४ पक्षांनी नोदणीसाठी अर्ज केले.
मिळणारी मते मात्र किरकोळ
निवडणुकीत उमेदवार उभे करणाºया अशा पक्षांची संख्या खूप मोठी असली व ती सतत वाढत असली तरी त्यांची मतांची टक्केवारी जेमतेम एक टक्का आहे. आयोगाच्या एका अधिकाºयाच्या मतानुसार भारतातील पक्ष नोंदणीची प्रक्रिया खूपच सोपी व सुलभ असणे हे या मोठ्या संख्येचे एक कारण आहे. जाणकारांना मात्र राजकीय पक्ष काडण्यामागे केवळ निवडणुका लढविणे हेच कारण असल्याचे वाटत नाही. त्यांच्या मते अनेक पक्ष काळा पैसा पांढरा करण्यासाठी, देणग्या जमविण्यासाठी व प्राप्तिकरात सूट मिळविण्यासाठी काढले जातात.