बँकांकडून २,१६७ खेळाडूंना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 01:45 AM2016-03-18T01:45:26+5:302016-03-18T01:45:26+5:30
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तूर्तास खेळाडूंच्या कोट्यातून भरती करण्यात आलेले २,१६७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ५५९ अधिकारी आणि १,६०८ कनिष्ठ कर्मचारी आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तूर्तास खेळाडूंच्या कोट्यातून भरती करण्यात आलेले २,१६७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ५५९ अधिकारी आणि १,६०८ कनिष्ठ कर्मचारी आहेत. सर्वात मोठी बँक या नात्याने स्टेट बँक आॅफ इंडियात (एसबीआय) सर्वाधिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बँकांतर्फे खेल अकादमी आणि स्पर्धा प्रायोजित केल्या जातात. काही बँका खेळाडूंना शिष्यवृत्तीही देतात. यासंदर्भात प्रत्येक बँकेचे स्वत:चे धोरण आहे. कोट्यातून नियुक्ती मिळालेल्या खेळाडूंना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुविधा मिळतात.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वसामान्यपणे उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भरती केल्या जाते,असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, यामध्ये अधिकारी, लिपिक आणि कनिष्ठ कर्मचारी पदांवर नियुक्ती केली जाते. स्टेट बँक आॅफ इंडियात खेळाडू कोट्यातून सद्यस्थितीत २१४ अधिकारी आणि २०६ कनिष्ठ कर्मचारी कार्यरत आहेत. युनियन बँक आॅफ इंडियात २००, विजया बँकेत १४५, बँक आॅफ महराष्ट्रमध्ये १२२, बँक आॅफ इंडियात १०३ आणि बडोदा बँकेत ९० कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)
चार बँकांनी उघडले नाही खाते
उपलब्ध आकडेवारीनुसार भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत दोन कोटी दोन लाख रुपये खर्च केले तर एसबीआयच्या तुलनेत लहान असतानाही पंजाब नॅशनल बँकेने ३ कोटी २८ लाख रुपये खर्च केले.
बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने आतापर्यत ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. पण यूको बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेने मात्र यावर्षी अद्याप खेळांवर एकही पैसा खर्च केला नाही.