21व्या शतकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता भारतातून येईल, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीला जिग्नेशने जोडले मोदींशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 05:33 PM2018-01-04T17:33:27+5:302018-01-04T17:35:14+5:30
दलित नेता जिग्नेश मेवाणी यानं भीमा-कोरेगावमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
नवी दिल्ली- अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यानं भीमा-कोरेगावमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. यासाठी जिग्नेशनं मोदींनी गौरक्षकांकडून होणा-या दलितांवरील हल्ल्यासंदर्भात केलेल्या विधानाचा हवाला दिला आहे. तुम्हाला शूट करायचं असल्यास आधी मला शूट करा. परंतु माझ्या दलित मित्रांसोबत असा अन्याय करू नका.
मोदींच्या या विधानाला पकडून जिग्नेश मेवाणी यानं मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यानं ट्विटरच्या माध्यमातून मोदींना लक्ष्य केलं आहे. नॉस्ट्राडेमस भविष्यवाणी करून गेले आहेत की, 21व्या शतकात जगातील सर्वोकृष्ट अभिनेता भारतातून येईल, अशा आशयाचं ट्विट करत मेवाणींनी मोदींवर टीका केली आहे. भीमा-कोरेगाव युद्धाच्या 200व्या वर्षानिमित्त कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर दलितांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर या हिंसाचाराचे लोण मुंबईपर्यंत पोहोचले. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
Nostradamus predicted that In 21st century world's best actor will be from India.#BhimaKoregaon#NarendraModiLies#FakeDalitPrempic.twitter.com/anvIsRUB2a
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) January 4, 2018
गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केलं आहे. छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.