‘ऑक्सिजन माॅक ड्रील’मुळे आग्र्यात २२ रुग्णांचा मृत्यू?, व्हायरल व्हिडिओमुळे घटना उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:54 AM2021-06-09T05:54:46+5:302021-06-09T05:55:34+5:30
प्राप्त माहितीनुसार, ही घटना २७ एप्रिलला माेदीनगर येथील पारस रुग्णालयात घडली. त्यावेळी माेदीनगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा हाेता.
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका रुग्णालयात ‘ऑक्सिजन माॅक ड्रील’ करण्यात आली. त्यात २२ अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या रुग्णालयाच्या मालकाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणाच्या चाैकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही घटना २७ एप्रिलला माेदीनगर येथील पारस रुग्णालयात घडली. त्यावेळी माेदीनगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा
हाेता.
रुग्णालयात त्यादिवशी ९६ रुग्ण ऑक्सिजन सपाेर्टवर हाेते. अशा स्थितीत काेणते रुग्ण जगू शकणार नाही, याबाबत जाणून घेण्यासाठी माॅक ड्रील करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला हाेता.
नेमके काय झाले?
- रुग्णालयाचे मालक अरिंजय जैन यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, की मुख्यमंत्र्यांनीही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली हाेती. त्यामुळे आम्ही रुग्णांना घरी नेण्यास सांगत हाेताे.
- २७ तारखेला सकाळी ७ वाजता ऑक्सिजनचा पुरवठा ५ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. काेणालाही याबाबत माहिती नव्हती. त्यावेळी ९६ पैकी २२ रुग्णांचे शरीर निळे पडले. हे रुग्ण ऑक्सिजनशिवाय जगू शकणार नसल्याची खात्री पटली. त्यानंतर उर्वरित ७४ जणांच्या नातेवाईकांना आम्ही ऑक्सिजन सिलिंडरची साेय करण्यास सांगितले.