दुर्दैवी! तुर्कीच्या कोळसा खाणीत मोठा स्फोट, २२ ठार, ५० जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 09:53 AM2022-10-15T09:53:58+5:302022-10-15T09:55:08+5:30
तुर्कीतील कोळशाच्या खाणीत अचानक भीषण स्फोट झाला.या स्फोटमध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
तुर्कीतील कोळशाच्या खाणीत अचानक भीषण स्फोट झाला.या स्फोटमध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना तुर्कीच्या काळ्या समुद्र किनाऱ्याजवळ घडली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून खाणीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोळसा खाणीत तयार झालेल्या मिथेन वायूमुळे अशी भीषण दुर्घटना घडू शकते. यासोबतच इतर कारणांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तुर्कीतील स्फोटाच्या घटनेनंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी दु:ख व्यक्त केले.त्यांनी आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच त्यांनी मदत मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे आदेश दिले, मृतांचा आकडा वाढू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
"हा अपघात तुर्कीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात आहे. आठ जणांना खाणीतून बाहेर काढले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी दिली.
"या खाणीत एकूण ११० लोक काम करत होते. त्यापैकी काही स्वत: बाहेर आले, काही लोक वाचले आहेत. तर यात काही लोकांचा मृत्यू झाला आहे.