चकमकीतील शहिदांची संख्या २२ वर; छत्तीसगडमधील घटनेची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:55 AM2021-04-05T03:55:08+5:302021-04-05T06:51:17+5:30

२५ ते ३० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश

22 Security Personnel martyrs In Action In Anti Maoist Operation | चकमकीतील शहिदांची संख्या २२ वर; छत्तीसगडमधील घटनेची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

चकमकीतील शहिदांची संख्या २२ वर; छत्तीसगडमधील घटनेची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

Next

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शहा यांनी छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकांना घटनास्थळाला भेट देऊन सविस्तर अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या धुमश्चक्रीत २५ ते ३० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आल्याचे सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंह यांनी सांगितले. 

छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते. १७ जवान मात्र बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली असता सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत ३० जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या ४०० हून अधिक होती, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांपुढे मी नतमस्तक आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. नक्षलवाद्यांना योग्य वेळी चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जखमी जवान लवकर बरे होवोत, हीच सदिच्छा.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.

Web Title: 22 Security Personnel martyrs In Action In Anti Maoist Operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.