२२ गिर्यारोहकांना जवानांनी वाचविले
By admin | Published: August 9, 2015 01:23 AM2015-08-09T01:23:54+5:302015-08-09T01:23:54+5:30
जम्मू-काश्मीरच्या लडाख क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या इंग्लंड आणि फ्रान्सच्या २२ गिर्यारोहकांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी गेल्या दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढले.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या लडाख क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या इंग्लंड आणि फ्रान्सच्या २२ गिर्यारोहकांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी गेल्या दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढले.
सेनेच्या उत्तरी कमांडचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी शनिवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, अत्यंत वाईट हवामानातही वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सनी धाडस करून लडाखच्या अत्युच्च क्षेत्रात अडकलेल्या गिर्यारोहकांना ६ आणि ७ आॅगस्टला सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये इंग्लंडचे २१ आणि फ्रान्सच्या एका नागरिकाचा समावेश आहे.
सतत पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे लडाख क्षेत्रातील इंडस, नुब्रा, शयोक आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रस्ते वाहतूक आणि दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. मरखा खोऱ्यात अडकलेल्या या लोकांपैकी काही अस्थमापीडित होते. वायुसेनेच्या ताफ्यातील प्रमुख हेलिकॉप्टर ‘सियाचीन पायोनिअर्स’ने ही मोहीम फत्ते केली. (वृत्तसंस्था)