२२ वर्षीय रुद्राली पाटील बनल्या ब्रिटिश उच्चायुक्त, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले अव्वल स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:01 AM2017-10-12T00:01:13+5:302017-10-12T00:01:23+5:30
ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या अधिकारावर सामाजिक व जीवन मूल्याच्या दृष्टीने मूलभूत मंथन मांडणा-या लातूर येथील रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांना ब्रिटिश उच्चायुक्तालयात दोन दिवस उच्चायुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
लातूर : ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या अधिकारावर सामाजिक व जीवन मूल्याच्या दृष्टीने मूलभूत मंथन मांडणा-या लातूर येथील रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांना ब्रिटिश उच्चायुक्तालयात दोन दिवस उच्चायुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रुद्राली या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नात आणि शैलेश व डॉ. अर्चनाताई यांच्या कन्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून ब्रिटिश उच्चायुक्तालयाने मुलींच्या अधिकारावर चित्रफीत स्पर्धा व चर्चा आयोजिण्यात आली होती. त्यामध्ये ‘मुलींचे अधिकार, सामाजिक दृष्टिकोन व परिवर्तनाचे मार्ग’ यावर चर्चा झाली. यात दिल्ली येथे कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय रुद्राली पाटील यांनी मुलींच्या अधिकारावर चित्रफीत बनविली. त्यानंतर यशस्वी स्पर्धकांची उच्चायुक्तालयाकडून दूरध्वनीद्वारे मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये रुद्राली यांनी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची भूमिका मांडली.
दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या रुद्राली पाटील यांना दिल्ली स्थित ब्रिटिश उच्चायुक्तालयामध्ये उच्चायुक्त म्हणून ९ व ११ आॅक्टोबर रोजी काम करण्याची संधी मिळाली. ‘कायद्याच्या पदवीच्या पाचव्या वर्षात शिकत असताना मिळालेली ही बहुमोल संधी अवर्णनीय आहे,’ असे रुद्राली यांनी सांगितले.