२,२४0 कोटींची बँकांची फसवणूक
By admin | Published: April 13, 2017 01:07 AM2017-04-13T01:07:39+5:302017-04-13T01:07:39+5:30
पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहास तब्बल २,२४0 कोटी रुपयांना फसविणाऱ्या सूर्या इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या चार संचालकांना सीबीआयने
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहास तब्बल २,२४0 कोटी रुपयांना फसविणाऱ्या सूर्या इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या चार संचालकांना सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना १0 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे.
दिल्लीचे महानगर दंडाधिकारी सुमित दास यांनी आरोपींना २२ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. आरोपींमध्ये संजय जैन, राजीव जैन, रोहित चौधरी, संजीव अग्रवाल यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. या चौघांनी तब्बल १00 शेल कंपन्यांच्या माध्यमातून बँकांना चुना लावला आहे. या कंपन्यांचा वापर करून त्यांनी पैसा अन्यत्र वळविल्याची तक्रार पंजाब नॅशनल बँकेने केली आहे.
चार आरोपींची सूर्या इंडस्ट्रीज ही कंपनी आणि अन्य शेल कंपन्या यांचा कोणताही वास्तविक व्यवसाय नाही. बँकांकडून कर्ज घेऊन नंतर त्यांनी हा निधी अन्य कंपन्यांकडे वळविला. या कर्जाची परतफेडही केली नाही. त्यातून बँकेला २,२४0 कोटी रुपयांचा फटका बसला.
३०० कोटी वळविले
- ३00 कोटी रुपयांचे खेळते भांडवलही आरोपींनी विदेशातील सहा कंपन्यांत वळविल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, शेल कंपन्या प्रत्यक्षात कुठलाही व्यवसाय करीत नाहीत.
पैशाची हेराफेरी करणे, काळा पैसा पांढरा करणे यासाठी अशा कागदोपत्री कंपन्या उघडल्या जातात. त्यांच्या माध्यमातून कागदोपत्री व्यवहार दाखवून पैसा इकडून तिकडे वळविला जातो.