रोजगार हमीवर २.२६ लाख मजूर, ३६१ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:39 AM2018-12-29T05:39:43+5:302018-12-29T05:40:45+5:30
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी लोकमतला सांगितले की, राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) सध्या एकुण ३६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये मजुरीसाठी २५० कोटी, कुशल कामासाठी ६० कोटी तर पाणंद रस्ते योजनेसाठीचे ५१ कोटी रुपये जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. राज्यात मनरेगा योजनेंतर्गत सध्या एकूण ४२ हजार कामे सुरू असून त्यावर २ लाख २६ हजार मजूर कामावर आहेत. चालू आर्थिक वर्षात मनरेगावर १ हजार ६१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मृद व जलसंधारणाच्या कामांबाबत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार कृषि विभागास देण्यात आलेले आहेत.
२८ नवीन कामांचा समावेश
मनरेगा अंतर्गत आता नवीन २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात शाळेसाठी तसेच खेळाच्या मैदानासाठी संरक्षक भिंत बांधकाम करणे किंवा साखळी कुंपण तयार करणे, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह निवारा, नाला मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, डांबर रस्ता, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, बचतगटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे आदींचा समावेश आहे.