विमानाने आलेल्यांपैकी २२७ जणांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:17 AM2020-06-06T05:17:15+5:302020-06-06T05:17:34+5:30
वंदे भारत मोहीम; केंद्राने मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना साथीमुळे विदेशात अडकलेल्या व वंदे भारत मोहिमेद्वारे विशेष विमानांतून मायदेशात परतलेल्या ५८,८६७ भारतीय नागरिकांपैकी फक्त २२७ जणांना म्हणजे ०.३८ टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाने परत आणताना एअर इंडियाने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, असा आरोप या कंपनीचे वैमानिक देवेन कनानी यांनी एका याचिकेत केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. काठावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.
नागरी हवाई वाहतूक संचालनालयातर्फे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, वंदे भारत मोहिमेद्वारे भारतात परतलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विमानातून प्रवास करताना हा संसर्ग झाला होता का याबद्दल ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या मोहिमेद्वारे विशेष विमानातून भारतात येण्याआधी संसर्ग नसलेल्या व देशात परतल्यानंतर या विषाणूची बाधा झालेल्या प्रवाशांची राज्यवार माहिती सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी हवाई वाहतूक संचालनालय व एअर इंडिया यांना मंगळवारी दिला होता.
रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यता
वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत विदेशातून महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा येथे परतलेल्या १८,८९६ भारतीय नागरिकांपैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद वैमानिक देवेन कनानी यांच्या वतीने अॅड. अभिलाष पण्णीकर यांनी केला.