आखाड्यात २२९३ राजकीय पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:40 AM2019-04-13T05:40:55+5:302019-04-13T05:40:56+5:30
चित्रविचित्र नावे : फेब्रुवारी-मार्चमध्ये १४९ नव्या पक्षांची नोंदणी
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात यंदा २२९३ राजकीय पक्ष उतरले असून, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ९ मार्चपर्यंतची ही आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. सात मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि ५९ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचा यात समावेश आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात १४९ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. भरोसा पार्टी, सबसे बडी पार्टी आणि राष्ट्रीय साफ नीती पार्टी यासारखी चित्रविचित्र नावेही या यादीत आहेत.
देशात २१४३ राजकीय पक्षांची नोंद झाली आहे. यातील ५८ नव्या राजकीय पक्षांची नोंद गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या वेळी झाली होती.
नोंदविण्यात आलेल्या पक्षांमध्ये बहुजन आजाद पार्टी (बिहार), सामूहिक एकता पार्टी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय साफ नीती पार्टी (राजस्थान), सबसे बडी पार्टी (दिल्ली), भरोसा पार्टी (तेलंगणा), न्यू जनरेशन पार्टी (तामिळनाडू) यांचा समावेश आहे. ज्यांची नोंदणी आहे. परंतु मान्यता नाहीत, अशा पक्षांना निश्चित चिन्हे दिली जात नाहीत. त्यांना आयोगाच्या समितीने सुचविलेल्या चिन्हांची निवड करावी लागते. सध्या अशा पद्धतीची ८४ चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातूनही पाच नवे पक्ष
महाराष्ट्रातूनही पाच राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. यामध्ये इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी (नवी मुंबई), आॅल इंडियन रिपब्लिक पार्टी (चंद्रपूर), अखिल भारतीय एकता पार्टी (उस्मानाबाद), महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (मुंबई) आणि दक्ष पार्टी (मुंबई) या पक्षांचा समावेश आहे.