पंजाबमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता, ट्रॅव्हल एजंटविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:29 AM2017-12-30T11:29:09+5:302017-12-30T11:30:49+5:30
पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते.
नवी दिल्ली- पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते. सीबीआयने याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. फरिदाबादमधील ललित डेव्हिड डिन आणि दिल्लीमधील संजीव रॉय व वरुण चौधरी या ट्रॅव्हल एजंटसच्या कार्यालयाची तपासणी करुन तेथिल काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या मुलांना परदेशात पाठविण्यासाठी त्यांच्या पालकांकडून 25-30 लाख रुपये उकळले होते. या मुलांचा व्हीसा मिळवताना 15-18 वयोगटातील 25 मुले रग्बीच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला जात असल्याचे या एजंटांनी भासवले होते.
सीबीआयचे प्रवक्ते CBI अभिषेक दयाळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, '' या सगळ्या 25 मुलांना रग्बीच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठbल्यावर ते आठवडाभर रग्बीच्या कॅम्पमध्ये राहिले. नंतर त्यांची परतीची तिकिटे रद्द करण्यात आली. मात्र सगळ्या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याची शंका आल्यामुळे तिकिटे रद्द करण्यापुर्वीच दोन मुले भारतात आले होते.''