शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:35 PM2024-08-12T19:35:48+5:302024-08-12T19:44:19+5:30
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शास्त्रज्ञ बनून एका तरुणाने आदर्श निर्माण केला आहे. कमल मौर्य असं या तरुणाचं नाव असून त्याने घवघवीत यश संपादन केलं आहे.
जे कठोर परिश्रम करतात, संघर्ष करतात त्यांना यश हमखास मिळतं. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शास्त्रज्ञ बनून एका तरुणाने आदर्श निर्माण केला आहे. कमल मौर्य असं या तरुणाचं नाव असून त्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा प्रिन्सिपलनी त्याला एडमिशनसाठी नकार दिला होता. आता त्याने शास्त्रज्ञ होऊन आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या तरुणांना एक नवी आशा आणि ऊर्जा दिली आहे.
कमलचं यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य उद्दिष्टे साध्य करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी प्रत्येक वाईट वेळेवर मात करत तो ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. कमल मौर्य हा अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज तालुक्यातील गुडूर गावचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचं नाव जयप्रकाश मौर्य असून ते शिक्षक आहेत.
कमलने गावातील शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथे त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कमलने बारावीनंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये बी.टेक डिग्री मिळवली. केरळमध्ये चार वर्षे तयारी केल्यानंतर, तो शास्त्रज्ञ होण्यासाठी कोटा, राजस्थान येथे गेला. तिथे राहून त्याने रात्रंदिवस मेहनत करून आपलं ध्येय गाठलं.
जुलै २०२४ मध्ये, कमल शास्त्रज्ञ झाला आणि भारताच्या उपराष्ट्रपतींनी त्याचा गौरव केला. कमलच्या वडिलांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी कमलला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी नेले तेव्हा मुख्याध्यापकांनी नकार दिला, परंतु त्याने हार न मानता आपल्या मुलाला शिक्षण दिलं आणि यशाच्या शिखरावर नेलं.
कमलने दिलेल्या माहितीनुसार, लहानपणापासूनच त्याचं शास्त्रज्ञ होण्याचं मोठं स्वप्न होतं. गावात लोक त्याला आता शास्त्रज्ञ म्हणून ओळखतात. कमल आणि त्याच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्याच्यापासून अनेक मुलांना प्रेरणा मिळत आहे. अनेकांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे.