23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी

By admin | Published: March 12, 2016 04:45 PM2016-03-12T16:45:52+5:302016-03-12T17:30:42+5:30

संपूर्ण देशाला हादरवणारे 1993 चे मुंबई बाँबस्फोट आजच्या दिवशी घडवण्यात आले होते. 257 जणांचे प्राण घेणारे व 717 जणांना जायबंदी करणारे हे स्फोट मुंबईत 13 ठिकाणी घडवण्यात आले होते

23 years ago, Mumbai was shocked today by 13 bomb blasts | 23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी

23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - संपूर्ण देशाला हादरवणारे 1993 चे मुंबई बाँबस्फोट आजच्या दिवशी घडवण्यात आले होते. 257 जणांचे प्राण घेणारे व 717 जणांना जायबंदी करणारे हे स्फोट मुंबईत 13 ठिकाणी घडवण्यात आले होते. दाऊद इब्राहिमने टायगर मेमन व याकूब मेमनच्या तसेच त्याच्या गुन्हेगारी जाळ्याच्या सहाय्याने हे बाँबस्फोट घडवले, ज्यापैकी याकूबला याच वर्षी फाशी देण्यात आली.
याच काळात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची गेल्याच महिन्यात सुटका झाली. 21 मार्च 2013 रोजी 20 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम आजपर्यंत फरार असून ते पाकिस्तानात असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सिद्ध केले आहे.
बाबरी मशिदीचं पतन, मुंबईत उसळलेले दंगे आणि त्यानंतर हे बाँबस्फोट अशी हिंसक मालिका 1992 ते 1993 या काळात सुरू होती. 
या भयानक बाँबस्फोटांची सुरुवात दुपारी दीड वाजता मुंबई शेअर बाजारापासून झाली. बेसमेंटमध्ये कार पार्किंगमध्ये घडवलेल्या या बाँबस्फोटात 50 जणांनी जीव गमावला. त्यानंतर अर्ध्या तासाने मस्जिदजवळच्या मांडवी बँकेजवळ बाँबस्फोट झाला आणि त्यानंतर शिवसेना भवन, एअर इंडिया बिल्डिंग, काथा बाजार, पासपोर्ट ऑफिस अशा आणखी एकूण 11 ठिकाणी पुढील दोन तासांमध्ये बाँबस्फोट घडवण्यात आले.
 
या स्फोटाचा घटनाक्रम :
- दुपारी १.३० वाजता - मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजळ्यावर स्फोट, ८४ ठार तर २१७ जण जखमी 
- दुपारी २.१५ वाजता - नरसी नाथा स्ट्रीट, कथा बाजार, ४ ठार, १६ जखमी
- दुपारी २.३० वाजता - पेट्रोल पंप, शिवसेना भवन, ४ ठार, ५० जखमी
- दुपारी २.३३ वाजता - एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, २० ठार, ८७ जखमी
- दुपारी २.४५ वाजता - मच्छीमार वसाहत, माहीम. ३ ठार, ६ जखमी
- दुपारी २.२५ वाजता - सेंच्युरी बाझार, वरळी, ११३ ठार, २२७ जखमी
- दुपारी ३.०५ वाजता - झवेरी बाझार, १७ ठार, ५७ जखमी
- दुपारी ३.१० वाजता - हॉटेल सेना रॉक, बांद्रा
- दुपारी ३.१३ वाजता - प्लाझा सिनेमा, दादर, १० ठार, ३७ जखमी
- दुपारी ३.२० वाजता - हॉटेल जुहू सेंटर, ३ जखमी
- दुपारी ३.३० वाजता-  सहार विमानतळाजवळ
- दुपारी ३.४० वाजता - हॉटेल एअरपोर्ट सेंटर, २ ठार, ८ जखमी
 
1993 च्या बाँबस्फोटत स्फोटात प्रथमच आरडीएक्सचा वापर करण्यात आला. मुंबईकरांनी प्रथमच आरडीएक्स हा शब्द यावेळी ऐकला. दुसर्या महायुध्दानंतर सर्वाधिक आरडीएक्सचा वापर करण्यात 1993 च्या बाँबस्फोटात करण्यात आला होता. 
 
काय आहे आरडीएक्स ?
आरडीएक्समुळे आजूबाजूच्या काही कि.मी. त्रिज्येच्या पसिरात मोठी प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. आरडीएक्सचा अर्थ रीसर्च डिपार्टमेंट एक्स्प्लोजिव्ह. प्रत्यक्षात ते एक रसायन असते व त्याचे नाव नायट्रोमाइन असून ते स्फोटक असते. त्याला सायक्लोनाइट किंवा हेक्झोजेन तसेच टी-४ अशीही नावे आहेत. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज फ्रेड्रिक हेनिंग यांनी आरडीएक्सचा शोध लावला तसेच त्याचे पेटंटही घेतले त्या वेळी त्यांनी हेक्झामाइन नायट्रेट या रसायनाचे संहत नायट्रिक आम्लाच्या मदतीने नायट्रेशन करून आरडीएक्सची निर्मिती केली होती, परंतु ते औषधांमध्ये वापरावे असा त्यांचा इरादा होता. त्याचा पुढे स्फोटक म्हणून वापर होईल असे कुणालाही वाटले नव्हते. शुद्ध आरडीएक्स हे पांढऱ्या स्फटिकांच्या स्वरूपात असते. साठवलेल्या स्थितीत ते स्थिर राहते पण इतर स्फोटकांबरोबर मिश्रण करून वापरल्यावर ते घातक ठरते. १७० अंश सेल्सियस तपमानाला त्याचे विघटन होत असते, २०४ अंश तपमानाला ते वितळते. डिटोनेटरच्या मदतीने त्याचा स्फोट केला जातो. त्याची घनता ही दर घनसेंटिमीटरला १.७६ ग्रॅम्स इतकी असली, तरी त्याचा वेग हा सेकंदाला ८ हजार मीटरपेक्षा जास्त असल्याने मोठी प्राणहानी होते.
 
 
 

 

Web Title: 23 years ago, Mumbai was shocked today by 13 bomb blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.