रेल्वेच्या १.२७ लाख पदांसाठी २.३७ कोटी अर्ज; दोन वर्षांत दुसरी मोठी भरती मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 01:16 AM2018-10-10T01:16:01+5:302018-10-10T01:16:11+5:30
भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.
भारतीय रेल्वेकडून दोन वर्षांत दुसऱ्यांदा अशी मोठी भरती केली जात आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, गँगमन आणि ट्रॅकमन अशा विविध पदांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेतली जात आहे. या पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या २0१८ मध्ये सीबीएसईची दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत १५ पट अधिक आहे.
जास्तीतजास्त लोकांना अर्ज करता यावा यासाठी रेल्वेने या पदांच्या भरतीसाठीच्या अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत. ग्रुप डी पदासाठी आधी आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. त्याऐवजी आता दहावी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. याच ग्रुपसाठी वयाची मर्यादा २८ वरून ३१ वर्षे करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षीच या अटी शिथिल करण्याची घोषणा केली होती.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सुरक्षा श्रेणीतील रिक्त जागा भरणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आमच्या सेवा कित्येक पटींनी वाढल्या आहेत. देखभालीवरील दबावही
त्याच प्रमाणात वाढला आहे. ही महाभरती त्यामुळेच हाती घेण्यात आली आहे.
अशी आहे रेल्वेची महाभरती
सध्याची कर्मचारी
संख्या : १२.५ लाख
एकूण रिक्त
पदे : २ लाख
भरली जात असलेली
पदे : १.२७ लाख
परीक्षा केंद्रे : ४४0 (११६ शहरांत)
परीक्षा कालावधी :
६0 दिवस (दररोज
५ लाख जण
परीक्षा देणार)