रामदेव बाबा म्हणतात, 23 मे मोदी दिन म्हणून साजरा व्हावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 08:31 PM2019-05-27T20:31:19+5:302019-05-27T20:32:56+5:30
रामदेव बाबांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपानं केंद्रातील सत्ता कायम राखली. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपानं देदीप्यमान विजय मिळवत इतिहास घडवला. त्यामुळे 23 मे रोजी मोदी दिवस साजरा व्हावा, असं मत योगगुरु रामदेव बाबांनी व्यक्त केलं. 23 मे हा ऐतिहासिक दिवस असून तो कायम लक्षात राहावा यासाठी तो मोदी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असं रामदेव बाबा पुढे म्हणाले.
23 मे भारतीय इतिहासातील गौरवशाली दिवस आहे. त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मोदी सरकारनं प्रचंड बहुमत मिळवलं, असं रामदेव बाबा म्हणाले. 'देशातील 50 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मोदी, भाजपा आणि एनडीएच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे 23 मे हा दिवस भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. हा दिवस कायम स्मरणात राहायला हवा. यासाठी तो मोदी दिवस किंवा लोक कल्याण दिवस म्हणून साजरा केला जावा,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.
रामदेव बाबांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. 'एका गरीब घरात, मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, चहा विकलेल्या नरेंद्र मोदींना संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळतो, ही बाब ऐतिहासिक आहे. त्यांनी भाजपाला एकहाती 300 हून अधिक जागा मिळवून दिल्या. लोकशाहीच्या दृष्टीनं ही अतिशय मोठी कामगिरी आहे. मोदींवर देवाची कृपा आहे. त्यामुळेच ते देशातील कोट्यवधी लोकांचा विश्वास जिंकू शकले. विरोधकांनी त्यांच्याविरोधात आघाड्या करुनही ते एखाद्या योद्धाप्रमाणे लढले आणि त्यांनी विजय मिळवला,' अशा शब्दांत रामदेव बाबांनी मोदींची प्रशंसा केली.